असण्याचा स्पर्श

दिसणं आणि असणं… या दोन गोष्टींच्यामध्ये जरी बारीकसा धागा असला तरी त्यामागची खोली अतोनात मोठी असते. आपण एखाद्या व्यक्तीकडे पाहतो तेव्हा आपल्या नजरेला जे दिसतं ते फक्त रूप, हावभाव, आवाज—पण जे मनाला भिडतं, ते या बाह्य आकारापेक्षा कितीतरी वेगळं असतं. उपस्थित देह दिसतो, पण त्यामागची उब, स्पर्श, शांतता… हे कधीच डोळ्यांनी पाहता येत नाही; ते फक्त अनुभवलं जातं.

माणसं दिसण्याने ओळखली जातात, पण असण्याने स्मृतीत रुतून बसतात. म्हणूनच एखादी व्यक्ती आपल्याजवळ नसली तरी तिचा स्पर्श, तिचा प्रकाश, तिच्या मनातील सहजता—हे सगळं आपल्या आयुष्यात दीर्घ श्वासासारखं चालत राहतं. कधी एखादी आठवण आली तर शब्दही न उच्चारता मन हलकं होतं. देह नाही, पण त्यांच्या “असण्याचा” नाद अजूनही जागा असतो.

काही लोकांचा प्रभाव आवाजाने होत नाही; त्यांच्या शांततेत एक वेगळा भार असतो. ते एक क्षण बाजूला झाले तरी त्या क्षणाची उब बराच वेळ आपल्या मनात तशीच राहते. हा परिणाम त्यांच्या रूपाचा नसतो—तो त्यांच्या आतल्या तेजाचा असतो.

असणं हे नजरेचा विषय नसतं; ते अंतर्मनाची भाषा आहे. आपण एखाद्यावर विश्वास का ठेवतो, कोण मनात खोलवर का बसतं, कोणाचा स्पर्श आपल्याला आधार देतो—याचं उत्तर कधीच त्यांच्या बाह्य स्वरूपात नसतं; ते त्यांच्या सत्त्वात दडलेलं असतं.

याच संदर्भात कृष्णाचं उदाहरण सहजच आठवतं. त्याचा देह, त्याचं रूप, त्याचे चमत्कार—हे सारे वर्णनात आहे. पण कृष्णाला लोकांनी खऱ्या अर्थाने जपलं ते त्याच्या “असण्यामुळे”.
कृष्णाचे शब्द, त्याची शांत बुद्धी, नात्यातील प्रेमाची त्याची पद्धत—हे आजही जगाला मार्ग दाखवतं. तो देहाने हजारो वर्षांपूर्वी होता, पण त्याचं अस्तित्व अजूनही कित्येकांच्या आयुष्यात चालतं. देह गेला… असणं टिकून राहिलं. आणि हेच कृष्णाच्या उदाहरणातून स्पष्ट होतं—अदृश्य असणं हे दृश्य देहापेक्षा अनेक पटींनी प्रभावी असतं.

दूर गेल्यावर व्यक्ती अधिक स्पष्ट दिसते. कारण तिच्या असण्याचा ठसा तिच्या गैरहजेरीत अधिक घन होतो. तिची शिकवण, दिलेलं प्रेम, स्पर्शलेली शांतता—हे सगळं देहाविना देखील आपल्या आयुष्याला दिशा देत राहतं. जणू एक प्रकाश, ज्याला कंदील नसला तरी उजेड आहे.

आपण एखाद्याला त्यांच्या शब्दांनी नाही समजत; आपण त्यांना त्यांच्या अंतर्मधील लयीने समजतो. म्हणूनच माणूस केवळ दिसण्याने लक्षात राहत नाही—तो आपल्या असण्यातून मनात घर करतो. बाह्य रूप काळानुसार बदलतं, पण असणं बदलत नाही; ते अधिक पारदर्शक, अधिक स्थिर, अधिक जिवंत होत जातं.

खरं पाहता, देह हा नजरेचा विषय असतो, पण अस्तित्व हा शांततेचा. एखादी व्यक्ती आपल्यात किती खोलवर रुजली आहे, हे तिच्या उपस्थितीत नाही तर तिच्या गैरहजेरीत कळतं. जी आपल्याबरोबर चालत नाही, पण आपल्यामध्ये चालत राहते—यालाच असणं म्हणतात.

आणि या असण्याची जादू अशी की ती कधीही दिसत नाही, पण आयुष्यभर जाणवत राहते.

—-पूजा पांडे

Share
Pin
Tweet