रोज बाहेर पडताना आपण एक पिशवी उचलतो – कधी ऑफिसची, कधी शाळेची, कधी भाजीची. पण खरी पिशवी ती नसतेच. खरी पिशवी म्हणजे मनात दडलेलं, न बोललेलं ओझं – जबाबदाऱ्या, अपेक्षा, थकवा, आठवणी.
आईच्या खांद्यावर ती पिशवी नेहमी असते – सगळ्यांची काळजी, स्वतःला विसरणं, आणि तरीही हसून सगळं हाताळणं. पुरुषांच्या पिशवीतही तितकंच वजन – घराचं प्रेशर, न बोललेलं अपयश, काळजाचा ताण. वृद्धांच्या पिशवीत असतात आठवणी आणि एकटेपणाची सल. अगदी लहान मुलांच्या खांद्यावरसुद्धा पिशवी असते – लक्ष न मिळालेलं, शाळेचा दबाव, घरचं वातावरण.
या पिशव्या दिसत नाहीत, पण सतत जाणवतात. कधी गाणं भिडतं, कधी कुणाचं एक वाक्य मनाला स्पर्शतं – आणि त्या क्षणी पिशवी हलकी वाटते. खरं तर एवढंच पुरेसं असतं – एक साधं “ठीक आहेस ना?”
एकदा बसमध्ये शेजारी बसलेल्या आजीला पाहिलं होतं. हातात छोटी पिशवी होती, पण चेहऱ्यावर मोठं ओझं. गप्पगप्प बसलेल्या त्या आजीला कुणीच विचारलं नव्हतं. ड्रायव्हरने सहज विचारलं, “आई, कुठं उतरायचं?” एवढं ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाल्या, “कोणीतरी विचारलं तरी बरं वाटलं रे बाबा…”
त्याक्षणी लक्षात आलं – खरी पिशवी त्यांच्या हातातली नव्हती, ती तर मनातलीच होती.
खरी पिशवी ती असते जी खांद्यावर नसूनही नेहमी तिथेच असते. मनाच्या एखाद्या कोपऱ्यात अडकलेली… न सांगता सोबत येणारी… आणि न सांगता आपल्यावर हलक्या थराने वाढत जाणारी.
समस्या अशी की आपल्याला दुसऱ्याची पिशवी दिसत नाही. सगळ्यांनाच वाटतं – तो/ती तर ठीकच आहे. पण खांद्यावरचं ओझं मात्र प्रत्येकाचं जड आहे. म्हणूनच कधी स्वतःसाठी थांबणं, स्वतःकडे पाहणं, हीसुद्धा जबाबदारीचाच भाग आहे.
प्रेमसंबंधांतही या पिशव्या येतात – अपेक्षा, गैरसमज, न बोललेले प्रश्न. संवाद हरवला की त्या अजून जड होतात. आणि हलकी होतात फक्त एका वाक्याने – “सांग ना, मी ऐकतो.”
शेवटी, प्रत्येकाकडे एक अदृश्य पिशवी असते. कुणाची भावनांनी भरलेली, कुणाची अपेक्षांनी, कुणाची जबाबदाऱ्यांनी, कुणाची एकटेपणाने. ती पिशवी आपणच उचलतो, आणि विसरतो – की कधी कधी ती खाली ठेवणंही ठीक असतं.
कधी स्वतःसाठीही चालत रहा. कधी दुसऱ्याच्या पिशवीची जाणीव ठेवा. कधी एक हलकंसं “ठीक आहेस ना?” इतकं बोलून पहा…
कदाचित कुणाची तरी खांद्यावरची पिशवी त्या क्षणी थोडी हलकी होईल.
तुम्ही कुणाची पिशवी नाही उचलू शकत, पण तुमचं एक प्रेमळ वाक्य तिचं वजन नक्कीच कमी करू शकतं.
—लेखिका: पूजा पांडे


