कर्माची पावती उशिरा येते… पण चुकत नाही

जगात कुणी कुणावर अन्याय करतं, कुणी कुणाला कमी लेखतं, कुणी खोटं बोलून पुढे सरकतं — आणि आपण शांतपणे पाहत राहतो. आत कुठेतरी चीड येते, पण मनात एकच प्रश्न झळकतो: “याला काहीच होणार नाही का?”

पण विश्वाचं हिशोब वेगळंच असतं.
आपण बघत नाही म्हणून ते काम करत नसतं, असं नाही.
कर्माचा आवाज नसतो — पण त्याची चाल भारी असते.

कर्माचा नियम साधा आहे पण अनुभव अवघड —
उशीरा येईल… पण चुकणार नाही.

काही लोकांना वाटतं की त्यांचे वाकडे धंदे, वाकडी बोलणी, वाकडी वृत्ती, वाकडं वागणं — हे सगळं ‘सेट’ आहे.
त्यांना एक क्षणभर तरी थांबून वाटत नाही की जीवनाला कोणी रेकॉर्ड बुक दिलंय आणि ते पुस्तक त्यांच्यावर लिहितंय.

कर्माचं सौंदर्य नेमकं इथंच आहे—
ते कधीही तात्काळ उत्तर देत नाही, पण परत येताना ते अगदी योग्य व्यक्तीला, योग्य वेळी, योग्य पद्धतीनं उत्तर देतं.

कधी एखादी व्यक्ती तुम्हाला खालच्या नजरेत पाहते, आणि तुम्ही शांत राहता.
तो शांतपणा तुमचा कमकुवतपणा नसतो; तो कर्मासाठी जागा ठेवलेला मार्ग असतो.
कारण आज कुणी तुम्हाला कमी लेखलं तरी उद्या त्याच व्यक्तीला समजतं—अरे, इथं चूक माझी होती.

आणि त्या जाणिवेची पावती कोणत्याच पगारात मिळत नाही.
ती फक्त कर्म देऊ शकतं.

कर्माची मजा काय?
ते लोकांना त्यांच्या स्वतःच्या वागण्याशी सामना घडवतं.
ज्याने कुणाचं मन दुखावलं, तोच एखाद्या वळणावर स्वतःच तुटताना दिसतो.
ज्याने कुणाची वाट रोखली, त्याचीच वाट अचानक अवरोधांनी भरते.
ज्याने कुणाला मदत केली, त्याला कोणत्यातरी दारावर अचानक उघडलेली संधी भेटते.

हे थेट देणे-घेणे नसतं.
ही ऊर्जा असते.
आपण जसं देतो, तसं जग आपल्याकडे परत फेकतं.

काही लोकांना वाटतं की ते बऱ्याच गोष्टी “लपवून” करतात.
पण कर्माला CCTV लागत नाही.
ते तुमच्या आवाजाकडे बघत नाही; तुमच्या भावनाकडे बघतं.
तुम्ही काय बोललात त्यापेक्षा, तुम्ही का बोललात — हे तिथं जास्त महत्वाचं.

म्हणूनच चांगुलपणा नेहमी शांततेत काम करतो.
तो पोस्ट करत नाही, तो स्टोरी टाकत नाही, तो ढोल पीटत नाही.
पण एक दिवस, अगदी अनपेक्षित दिवशी, त्याची फुलं तुमच्यासमोर उघडलेली असतात.
तुम्ही आश्चर्यचकित होता—“हे कधी पेरलं होतं मी?”
आणि विश्व हसत उत्तर देतं—“तू विसरलास, मी नाही.”

कर्माचं टाइमटेबल विचित्र असतं.
कधी खूप उशिरा येतं, कधी अचानक येतं, कधी गुपचूप येतं.
पण एक गोष्ट कायम —
ते हात रिकामे आणत नाही.

कर्माच्या पावलांचा आवाज नसतो;
पण त्याच्या आगमनाची चाहूल प्रत्येकाला लागते.
ज्याने चांगुलपणा पेरला तो हलका होतो.
ज्याने वाईट पेरलं तो जड होतो.
आणि ही जड-हलकी ऊर्जा दिवसेंदिवस आपली वाट ठरवत जाते.

लोक म्हणतात, “कर्मावर विश्वास ठेवावा का?”
मी म्हणते — विश्वास नाही तरी चालेल, पण आदर ठेवा.
कारण कर्माला तुमच्या विश्वासाची गरज नसते;
त्याला फक्त तुमच्या कृतींचा थोडा मागोवा पुरतो.

आणि मग तो हिशोब तयार होतो —
तुमच्या नकळत, तुमच्याच वागण्याच्या शाईने.

म्हणूनच आज एखाद्याशी सौम्य बोला.
आज कोणाचा अपमान करू नका.
आज एखाद्याला थांबवा नाही, ढकलू नका.
आज एखाद्याला थोडी उब द्या.

कारण उद्या जग कोणत्या रूपात तुमच्यासमोर उभं राहतं, हे ठरवणं…
तुमच्या आजच्या वागण्यावरच अवलंबून असतं.

आणि शेवटी, कर्माची खासियत —
ते कधी न्यायासाठी ओरडत नाही.
ते फक्त दारावर उभं राहतं…
आणि म्हणतं:
“मी आलंय. तुझ्या पेरणीचा हिशेब घेऊन.”

—पूजा पांडे

Share
Pin
Tweet